Google Pay Convenience Fee : सध्या आपण भाजी खरेदीपासून ते मोठमोठ्या मॉलमध्ये डिजिटल पेमेंटसाठी सर्रास वापर करतो. पण आता युपीआय प्लॅटफॉर्मपैकी एक असलेल्या Google Pay कडून त्यांच्या वापरकर्त्यांना मोठा धक्का देण्यात आला आहे. गूगल पेने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ‘गुगल पे’च्या या निर्णयामुळे वीज, गॅस यासारखी युटिलिटी बिल्स भरणाऱ्या ग्राहकांकडून आता प्रक्रिया शुल्क आकारले जाणार आहे.

यापूर्वी ‘गुगल पे’कडून आकारण्यात येणाऱ्या या शुल्काचा भार ग्राहकांवर टाकला जात नव्हता. मात्र, आता ‘गुगल पे’च्या माध्यमातून बिल पेमेंट केल्यास ग्राहकांना हे शुल्क भरावे लागणार आहे समोर आलेल्या माहितीनुसार, बिल पेमेंटसाठी ग्राहकांकडून एकूण व्यवहाराच्या 0.5 ते 1 टक्का शुल्क आकारले जाऊ शकते. तसे घडल्यास या अतिरिक्त खर्चामुळे ग्राहकांच्या खिशाला कात्री बसणार आहे.
मात्र, क्युआर कोड स्कॅन करुन थेट बँक खात्यात पैसे ट्रान्सफर करण्याच्या व्यवहारांवर कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. फोन पे आणि पेटीएम या दोन्ही प्लॅटफॉर्मवर बिल पेमेंटसाठी यापूर्वीच शुल्क आकारणी सुरु झाली आहे. त्यामुळे आता Google Pay कडूनही शुल्क आकारणीचा निर्णय घेण्यात आला आहे.
2024 या आर्थिक वर्षात फिनटेक कंपन्यांनी युपीआय व्यवहारांसाठीची 12 हजार कोटी रुपयांच्या प्रोसेसिंग फीचा भार स्वत: सहन केला होता. मात्र, यंदाच्या आर्थिक वर्षात नफा वाढवण्यासाठी या कंपन्यांनी आता या शुल्काचा भार ग्राहकांवर टाकायचे ठरवले आहे. डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने 2000 रुपयांपेक्षा कमी पैशांच्या व्यवहारांसाठीचा व्यापारी कर रद्द करण्यास सांगितले होते. सरकार हे पैसे युपीआय कंपन्यांना देत होती. मात्र, तरीही या कंपन्यांना ग्राहकांकडून अपेक्षित नफा मिळत नव्हता.