पिंपरी-चिंचवड (दि. 21 फेब्रुवारी 2025) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे सन 2025-26 चे केंद्र व राज्य शासनाच्या योजनांसह सुमारे 9 हजार 675 कोटी 27 लाख रूपये खर्चाचे अंदाजपत्रक मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रविण जैन यांनी महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमधील दिवंगत महापौर मधुकर पवळे सभागृह येथे आज शुक्रवारी प्रशासक शेखर सिंह यांच्याकडे सादर केले.
आयुक्त शेखर सिंह यांनी सन २०२५-२६ चे मूळ अंदाजपत्रक सादर करणेपूर्वी मी पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांचे त्यांनी अंदाजपत्रकामध्ये घेतलेल्या सहभागाबाबत मनःपूर्वक आभार मानतो. पुढील वर्षाच्या अंदाजपत्रकाकरिता २२७९ नागरिकांच्या सूचना प्राप्त झालेल्या आहेत, ज्या नागरिकांच्या, शहराच्या विकासाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण आहेत आणि त्यापैकी ७८६ सूचनांचा अंदाजपत्रकामध्ये समावेश करण्यात आला आहे. या अर्थसंकल्पात नागरिकांचा सहभाग व हवामान अंदाजपत्रक या दोन नावीन्यपूर्ण वैशिष्ट्यांसह अंदाजपत्रक मी सादर केले आहे, असे सांगीतले.
सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात र.रु. ५८४१ कोटी (शिल्लकेसह) इतकी रक्कम जमा होईल, हे अपेक्षित धरुन सन २०२४-२५ या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक सादर केले होते. सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात र.रु. ६२५६.३९ कोटी (आरंभीच्या शिल्लकेसह) उत्पन्न अपेक्षित आहे व त्यात प्रत्यक्षात खर्च र.रु. ६२५१.३९ कोटी होईल व मार्च २०२६ अखेर र.रु. ५ कोटी इतकी शिल्लक राहील.
महापालिकेच्या वतीने करण्यात येणाऱ्या विविध विकासकामांसाठी -1962.72 कोटी इतक्या भरीव रकमेची तरतूद अंदाजपत्रकात केली गेली आहे. क्षेत्रीय स्तरावरील विकासकामांसाठी अ, ब, क, ड, इ, फ, ग, ह या क्षेत्रीय कार्यालयांसाठी अनुक्रमे 15 कोटी 6 लाख, 7 कोटी. 99 लाख, 18 कोटी 94 लाख, 18 कोटी 97 लाख, 10 कोटी 35 लाख, 25 कोटी 16 लाख, 10 कोटी 63 लाख, 30 कोटी 22 लाख रुपये इतकी तरतूद करण्यात आली आहे.
अंदाजपत्रकाची खास वैशिष्टये…
अंदाजपत्रकात स्थापत्य विशेष योजना या लेखाशिांतर्गत र.रु. 753.56 कोटी तरतूद प्रस्तावित आहे. शहरी गरीबांसाठी (BSUP) अंदाजपत्रक तरतूद र.रु. 1898 कोटी. जेडर बजेट महिलांच्या विविध योजनांसाठी भरीव तरतूद र. रु. 83 कोटी. दिव्यांग कल्याणकारी योजना तस्तूद र. रु. 62.09 कोटी. पाणी पुरवठा विषयक भांडवली विकास कामांकरिता र. रु. 300 कोटी. पी.एम.पी.एम.एलकरिता अंदाजपत्रकात र. रु. 417 कोटींची. भूसंपादनाकरिता र. रु. 100 कोटी तरतूद, अतिक्रमण निर्मुलन व्यवस्थेकरिता र. रु. 10 कोटी तरतूद, स्मार्ट सिटीसाठी र. रु. 50 कोटी तरतूद. अमृत २.० योजनेसाठी र.रु. 55.48 कोटी तरतूद करण्यात आली आहे.
आर्थिक वर्षात महानगरपालिकेने महत्वाचे उपक्रम हाती घेतले आहेत. ते पुढीलप्रमाणे…
महसूल वाढीवर भर देण्यासाठी मिनिसिपल बॉण्डची रचना करण्यात आली आहे या बाॅडद्वारे 200 कोटी रुपये उभारले जाणार आहेत. ही रक्कम मुळा नदी प्रकल्पाच्या विकासासाठी वापरली जाणार आहे.
ग्रीन बाॅड अंतर्गत हरित सेतू प्रकल्पांतर्गत रस्त्याचे जाळे विकसित करण्यासाठी गवळी माथा चौक ते इंद्रायणीनगर चौकापर्यंत टेल्को रस्ता बांधण्यासाठी 264 कोटी 87 लाख रुपयांची तरतूद आहे.
मालमत्ता कर वसुलीसाठी विविध उपाय योजना राबवण्यात येणार.
महापालिकेच्या विविध विभागांसाठी ड्रोन प्रतिमा वापरण्यात येणार.
मुंबई-पुणे महामार्गालगत चिंचवड मधील सायन्स पार्क जवळ 35 एकर जागेवर पीपीपी मॉडेलवर पिंपरी चिंचवड महापालिका सिटी सेंटर उभारणार आहे.
नेहरूनगर येथील अण्णासाहेब मगर स्टेडियम येथे सात वेगवेगळ्या खेळांचे आयोजन अपेक्षित आहे.
पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरणासाठी भूसंपादन चार टप्प्यात करण्यात येणार आहे.
मोशी येथे सेक्टर 11 मध्ये संविधान भवन उभारण्यात येणार आहे. त्यासाठीची आवश्यक तरतूद देखील या अर्थसंकल्पात करण्यात आलेली आहे.
सहा एकर जागेत नवीन औद्योगिक प्रशिक्षण संस्था उभारण्यात येणार आहे. तसेच महापालिकेच्य नवीन प्रस्तावित मुख्य प्रशासकीय इमारतीसाठी निधीची तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात आलेली आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका एकूण 34 डीपी रस्त्यांच्या विकासाची कामे सुरू करणार आहे. 48.94 किलोमीटर ऐवढे हे अंतर आहे. 809 कोटी एवढी निधीची तरतूद अंदाजपत्रकात करण्यात आलेली आहे.
वाहतूक कोंडी सोडवण्याच्या दृष्टीकोनातून महापालिका एकूण 25 चौकांचे बांधकाम करणार आहे.
हरित सेतू अंतर्गत निरोगी स्वच्छ प्रदूषणमुक्त सुरक्षित वातावरण तयार करण्यात येणार आहे. पाणीपुरवठासाठी lअर्थसंकल्पात 300 कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे.
भामा आसखेडच्या पाण्यासाठी 1674 वॉटर पंपिंग स्टेशनचे बांधकाम याशिवाय सतराशे मीटर व्यासाची पाण्याची पाईपलाईन आणि चौदाशे मीटर विकासाचे मुख्य जलवाहिनी टाकण्यात येणार आहे. 2025 पर्यंत हे काम पूर्ण करण्यात येणार आहे.
ड्रेनेज मास्टर प्लॅन अंतर्गत शहरातील वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन सन 2024 साठी एकात्मिक सांडपाणी मास्टर प्लॅन तयार करण्यात आलेला आहे. त्यानुसार एकूण 310 एम एल डी क्षमतेची सांडपाणी प्रक्रिया केंद्र बांधण्यासाठी अंदाजपत्रकात 1462.16 कोटी रुपयांचा डीपीआर तयार करण्यात आलेला आहे.
आरोग्याच्या पायाभूत सुविधांचे सक्षमीकरण व्हावे यासाठी नव्याने उद्घाटन झालेल्या तालेरा हॉस्पिटलमध्ये युरोलॉजी आणि प्लास्टिक सर्जरी विभाग सुरू करण्यात येणार आहेत. महापालिकेच्या चार नवीन रुग्णालयांमध्ये डायलिसिस युनिट सुरू करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सिटीस्कॅन सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी देखील प्रयत्न सुरू आहेत. थेरगाव रुग्णालयामध्ये कॅन्सर हॉस्पिटल सुरू करण्याची देखील प्रक्रिया सुरू आहे. जुन्या तालेरा रुग्णालयात 30 बेडचे बर्न वार्ड करण्यात येणार आहे.
अग्निशमन दलाच्या प्रस्तावित केंद्रीय अग्निशमन केंद्रासाठी देखील निधीची तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात आलेली आहे. अग्निशामक विभागासाठी उच्चस्तरीय साधनांची खरेदी करण्यात येणार आहे. त्यातील प्रगत अग्निशमन वाहनांसाठी 56 कोटींची करण्यात आलेली आहे. त्याशिवाय अग्निशमन कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठी देखील तरतूद आहे.
इंद्रायणी नदीसुधार करिता सन 2025 26 च्या अर्थसंकल्पात 112.50 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे.
याशिवाय लाईट हाऊस, पीसीएमसी आणि सिम्बॉयसिस स्किल युनिव्हर्सिटी तरूणांच्या रोजगारासाठी संयुक्त डिप्लोमा अभ्यासक्रम राबवण्यात येणार आहे. दिव्यांगांसाठी देखील तरतुद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. याशिवाय सक्षमा प्रकल्प, कचरा वेचक कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी योजना आहेत.
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत चर्होली, बोऱ्हाडेवाडी, आकुर्डी, पिंपरी, डुडुळगाव येथील प्रकल्प अंतर्गत 4858 घरांची निर्मिती करण्यात येत आहे. त्यासाठी देखील निधीची तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात आलेली आहे.
याशिवाय भोसरी, कासारवाडी येथे नवीन इंग्रजी माध्यम आणि वाकड येथे सीबीएसई बोर्डाची शाळा उभारण्यात येणार आहे.
खेळासाठी वाकड येथे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या बॅडमिंटन कोर्टाचे बांधकाम करण्यात येणार आहे. पिंपळे सौदागर येथील गिर्यारोहणासाठी क्लाइंबिंग वाल तयार करण्यात येत आहे. निगडी येथील मदनलाल धिंग्रा मैदानावर नवीन क्रीडा संकुल उभारण्यात येणार आहे.
महापालिकेच्या छतांवरील एलईडी सोलर पॉवर, वाहनांसाठी ईव्ही चार्जिंग सिस्टीमसाठी देखील निधीची तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात आलेली आहे. तळवडे येथील जैव विविधता उद्यानासाठी देखील निधीची तरतूद करण्यात आली आहे.